चला अनुभवुया धम्माल ‘जर्मनी ऑक्टोबर फेस्ट’ची...
मंडळी अगदी साधा प्रश्न.. कोणाकोणाला माहितेय ‘ऑक्टोबर फेस्ट’बद्दल..? या प्रश्नाला फारसे समाधानकारक उत्तर मिळतेच असे नाही. बऱ्याच जणांचा अगदी बेसिक प्रश्न.. ‘कुठे असतो हा फेस्टिव्हल..?’ मध्यंतरी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून जे मित्र, नातेवाईक, ओळखीचे भेटत होते, त्यांना मुद्दामच हा प्रश्न विचारला. म्हटलं.. पाहुया तरी काय माहिती आहे या ‘ऑक्टोबर फेस्ट’बद्दल.. पण प्रत्येकाकडे वेगवेगळी माहिती होती. मग ठरवलं.. अगदी सखोल ज्ञान नाही तरी, काही गोष्टी गरजेपुरत्या का होईना, माहीत असायला हव्या. प्रामुख्याने जेव्हा आपण देश-विदेशाच्या पर्यटनाला बाहेर पडतो, तेव्हा तर त्या संबंधित ठिकाणाची जुजबी माहिती असणे कधीही उत्तम. म्हणूनच यासंबंधी मला जे माहीत आहे, ते तुमच्या सोबत शेअर करतोय. तर मंडळी आता केवळ दिड महिन्यावर ‘ऑक्टोबर फेस्ट’ येऊन ठेपलाय आणि हा केवळ स्थानिक पातळीवरील इव्हेंट नसून आता ग्लोबल इव्हेंट झालाय. अगदी जर्मनीच्या पर्यटनाला मिळालेला एक नवा आयामच. मग.. आता तुमचीही उत्सुकता वाढतेय ना.. चला तर या फेस्टिव्हल विषयी आणि यानिमित्ताने जर्मनीच्या मस्त वेगळ्या सहलीविषयी जाणून घेऊ.
आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या युरोपच्या केंद्रस्थानी असलेला जर्मनी हा देश. इतिहासातील दोन महायुद्धे, त्यानंतर झालेले पूर्व आणि पश्चिम असे विभाजन आणि नव्वदीच्या दरम्यान पुन्हा एकत्रितपणे संयुक्त जर्मनी म्हणून आजही स्वतंत्र ओळख असलेला हा देश. बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सिडीज अशा गाड्या, फुटबॉल, कुकू क्लॉक ही जशी यांची एक ओळख, तशीच ब्लॅक फॉरेस्ट केक, बिअर आणि बिअर फेस्टिवल, चॉकलेट्स, बेकिंग आणि त्यानुषंगाने येणारे ब्रेड आणि केकचे प्रकार हे जर्मन खाद्यसंस्कृतीचे एक प्रातिनिधिक स्वरूप. बर्फाच्छादित आप्ल्स आणि घनदाट जंगलांपासून र्हाइनच्या खोर्यापर्यंत विविधतेने नटलेल्या परंपरांची खाद्य-पेय संस्कृती जर्मन्स अगदी अभिमानाने बाळगून आहेत. जर्मनीच्या उत्तरेपासून दक्षिणेकडे जावे तसे भौगोलिक परिस्थिती बदलते तसे खाण्यापिण्यातही बदल होत जातात. मद्य हा पाश्चिमात्य देशांमधला विशेषत तेथील खाद्यसंस्कृतीतला एक अविभाज्य घटक आहे. जर्मनीत बिअर ही पाण्यासारखी प्यायली जाते हे बहुतेकांनी ऐकलेले असेलच. ऑक्टोबरच्या आसपास जर्मनीत येणारा माणूस हा म्युनिकचा ‘बिअर फेस्टिवल’ शक्यतो चुकवत नाहीच. इनफॅक्ट आता तर त्या तारखांनुसार सहलीचे नियोजन करण्यावर सर्वांचा भर असतो. देशोदेशीचे पाहुणे मोठ्या संख्येने यावेळी आलेले असतात.
याचा इतिहासही अत्यंत रोचक आहे. आत्ताचे म्युनिक म्हणजे पुर्वीचा बव्हेरिया प्रांत. इ.स. १८१० मध्ये बव्हेरियाचा राजपुत्र लुडविक आणि साक्सनची राजकन्या थेरेसा यांच्या विवाहाच्या मेजवानीप्रित्यर्थ १२ ते १७ ऑक्टोबर असा पहिल्यांदा हा सोहळा झाला. घोड्यांच्या शर्यतीने त्याची सांगता झाली. तेव्हापासून आजतागायत म्युनिकचा ‘ऑक्टोबर फेस्ट’ त्याचं खास वैशिष्ठ्य टिकवून आहे. कालांतराने मात्र ऑक्टोबरमधल्या थंडगार हिवाळ्यात याचा आस्वाद घेता येत नाही हे लक्षात आल्यावर आता तो सप्टेंबरच्या शेवटून दुसर्या शनिवारी सुरू करून ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी संपतो.
ज्या पेल्यातून बिअर देतात त्याला ‘मास’ म्हणतात. हा मास म्हणजे १ लिटरचा जंबो जगच असतो आणि तंबूत काम करण्यासाठी एका हातात ५ आणि दुसर्या हातात ५ भरलेले मास धरून नेता आले पाहिजेत अशी अटच असते. फक्त म्युनिक मधल्याच ब्रुअरीजना या जत्रेत बिअरचे स्टॉल लावता येतात. सजवलेल्या घोडागाडीतून बिअरची पिंपे वाजतगाजत मिरवणुकीतून आणली जातात. मिरवणुकीमध्ये पारंपरिक बायरीश कपडे घालून लोक नाचत, गात असतात. 'दि विसन' म्हणजे खरं तर 'थेरेसिअनविसं'! हे विस्तीर्ण पटांगण राजकन्या थेरेसाच्या नावाने ओळखले जाते, त्याचे लघुरुप 'दि विसन' असेच बायरीश (बायर्न हे राज्य, आणि या भागातले लोक म्हणजे बायरीश) मंडळीत आणि आता सर्वत्रच प्रचलित आहे. c तिथे वाईस वुर्ष्टच्या १ फूटी जंबो नळ्या, बुढ्ढीके बाल, बर्फाचे गोळे, पाकवलेले बदाम, लेबकुकन म्हणजे बायरीश खासियतीची लवंग, दालचिनीच्या स्वादाची मसाला बिस्किटे, भिरभिर्यांच्या गाड्या, जत्रेतले पाळणे, डोंबार्यांचे खेळ.. एक ना दोन अशा अनेक गोष्टींनी ही पालं फुललेली असतात आणि लहानथोर सारेच जत्रेचा मनमुराद आनंद घेत असतात.
अल्कोहोल नसलेली बिअरही यावेळी उपलब्ध असते. फळांच्या फ्लेवर्सचे बिअर राडलरही लोकप्रिय आहे. बार्ली, गहू, मका यापासून नॉर्मल, पिल्स्, ड्राफ्ट, क्रिस्टाल, डुंकेल, हर्बज घातलेली आल्टबिअर अशा वेगवेगळ्या २००० पेक्षाही जास्त प्रकारच्या बिअर जर्मनीत तयार होतात. विविध हर्ब्ज घातलेली काळपट रंगाची आल्टबिअर चक्क ज्यूसच्या पेल्यातून देतात तर, गहू आणि यिस्ट वापरून केलेली हेफवायझन बिअर फुटबॉलचषकासारख्या आकाराच्या विशिष्ट प्रकारच्या पेल्यातून देतात. गव्हापासूनच्या बिअरला गमतीने ही मंडळी 'फ्लुसिग ब्रोट' म्हणजे 'लिक्विड ब्रेड' म्हणतात.
बिअरपाठोपाठ वाईन हे देखील येथील आवडते पेय. फ्रान्स, इटलीला लागून असलेल्या सीमाभागातील काही राज्यांमध्ये आणि इतरही ठिकाणी द्राक्षशेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्या त्या भागातील वाईन मग आपापल्या प्रदेशाची ओळख मिरवत असतात. ग्लुवाईन शिवाय नाताळ साजरा झाल्यासारखे वाटत नाही हेही खरेच. अॅपल ज्युस ही पण जर्मनीची एक विशेष ओळख. वेगवेगळ्या फळांपासुन बनवण्यात आलेल्या लिकर पण तुम्हाला चाखता येतात. ज्यूस किंवा वाईनसोबत कार्बोनेटेड पाणी मिसळून केला जाणारा खास जर्मन प्रकार म्हणजे शोर्ल. अॅपलशोर्लं हे या सर्वात लोकप्रिय. पाण्याचा वापर इतर पेयांच्या तुलनेत कमी आहे आणि कार्बोनेटेड पाणी विशेष आवडीचे. कोकाकोला, फँटा, आइस-टी ही बाटलीबंद शीतपेये जर्मन लोक पाण्यापेक्षा जास्त पितात ही अतिशयोक्ती नाही.
काय मग.. जरा वेगळीच माहिती मिळाली ना..! हटके पण वाटतेय.. चल तर मग.. आता वेळ दवडू नका.. यंदाचा हा ऑक्टोबर फेस्टिव्हल तुम्हाला एन्जॉय करायचा असेल तर, इन्तियामात्कात ट्रॅव्हल कंपनीच्या वेबसाईटला भेट द्या. www.intiamatkat.fi ‘जर्मनी ऑक्टोबर फेस्ट’चे औचित्य साधत जर्मनीसोबतच ऑस्ट्रियामधील मोझार्टचे गाव साल्झबर्गला देखील भेट देण्याची संधी या सहलीत आहे. सहा रात्री आणि सात दिवसांच्या या सहलीची सुरुवात होते ती जर्मनीतील म्युनिकपासून. पहिले दोन दिवस म्युनिक आणि परिसरातच या फेस्टिव्हलची मजा लुटल्यानंतर आपण जातो साऊथ जर्मनीतील अत्यंत सुंदर अशा आल्प्सच्या परिसरांतील आर्टिस्टीक गावं आणि सिटी लाईफ अनुभवायला. सोबतच ऑस्ट्रियातील साल्झबर्ग, इन्सब्रुक, वॉटन्स या ठिकाणी. जर्मनी सोबतच ऑस्ट्रियातील मोझार्टची सुरमयी ट्रिट देखील आपल्याला या एकाच टूर मध्ये अनुभवता येणारेय. २८ सप्टेंबरला आपण मुंबई येथून म्युनिकला प्रस्थान करतोय. त्यानंतर दोन दिवस या फेस्टची मजा लुटून, आपण सदर्न आल्प्स आणि ऑस्ट्रिया या ठिकाणांची सैर करणार. २ ऑक्टोबर रोजी म्युनिकचा पारंपरिक ‘गन सॅल्यूट’ सेरेमनी झाल्यानंतर 3 ऑक्टोबरला आपण मोझार्टच्या गावाला भेट देणार आहोत. साल्झबर्गची मजा अनुभवून आपण ४ तारखेला पुन्हा मुंबईच्या दिशेने प्रयाण करणार. इन्तियामात्कात कंपनीने खास तुमच्यासाठी असा निवांत कार्यक्रम आखलाय. ऑक्टोबर फेस्ट सोबत जर्मनी आणि ऑस्ट्रियाची परिपूर्ण आणि मनसोक्त सैर आपण करणार आहोत. काय म्हणता..! बिअरच्या ग्लासाची स्वप्न आत्ताच पडायला लागली.. चला तर मग.. आता वेळ दवडू नका.. वेळेत नियोजन करा.. बॅग भरा आणि सज्ज व्हा.. सोबत इन्तियामात्कात आहेच.